*शेतकऱ्याचं स्वप्न*
*शेतकऱ्याचं स्वप्न*
पाणी देतो ऊसाला
स्वप्न घेऊन उशाला
स्वप्न घेऊन उशाला
आज लावलं बेनं
उद्या होईल सोनं
तरारतील हिरवी पानं
पाखरं गातील गानं
मग कुणाची मला भीती कशाला
पाणी देतो ऊसाला स्वप्न घेऊन उशाला
दिवस असो की रात्र
ऊन असो की सावली
फुलविण्या फड उसाचा
मेहनत सारी लावली
उन्हामधी राबून कोरड पडली घश्याला
पाणी देतो ऊसाला स्वप्न घेऊन उशाला
कानी आवाज येतो मंजुळ
पाणी पाटाचं वहात झुळझुळ
माझे कष्ट पाहुनी
पाऊस रडतो मुळूमुळू
आनंदले मन पाहून सशाला
पाणी देतो ऊसाला स्वप्न घेऊन उशाला
फड आला तुऱ्याला
ऊस भीडं डोक्याला
ऊस जाईल कारखान्याला
पैका मिळणं संसाराला
पैका आल्यावर शिकवीन वश्याला
पाणी देतो ऊसाला स्वप्न घेऊन उशाला
✍✍✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या